गुटखा पुरवठ्यावर छापा.
सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त,गुटख्याची माहिती देणारास पोलिसाकडून बक्षीस.

बीड (दि. 28 मार्च 2026) बीड शहरात बेकायदेशीर गुटखा व सुगंधी तंबाखू विक्रीवर बीड शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत सव्वा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. बशीरगंज चौक परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांना शहरात गुटखा साठवून किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार 28 मार्च रोजी बशीरगंज चौक येथे पथकाने सापळा रचला. यावेळी एक व्यक्ती स्कुटीद्वारे गुटख्याचा पुरवठा करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित स्कुटीचा पाठलाग केला.
ही स्कुटी बशीरगंज परिसरातील एका तीन मजली इमारतीजवळ थांबल्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. छाप्यात विविध प्रकारचा गुटखा व सुगंधी तंबाखू असा एकूण अंदाजे ₹1,27,192 किमतीचा साठा जप्त करण्यात आला. यासोबतच अंदाजे ₹85,000 किमतीची स्कुटीदेखील जप्त करण्यात आली.
या प्रकरणी फिर्यादी रामेश्वर बाबुराव पवार (वय 35, रा. बार्शी नाका) यांच्या तक्रारीवरून अमन माजिद मिर्झा बेग (वय 21, रा. बशीरगंज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने आर्थिक फायद्यासाठी राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व तंबाखू बेकायदेशीररित्या साठवून विक्री केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 223, 274, 275 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीस न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. तसेच जप्त केलेला गुटखा साठा नेमका कुठून आणण्यात आला, याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, उपनिरीक्षक महेश जाधव व त्यांच्या पथकाने पार पाडली.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्री व साठ्यावर बंदी घातलेली असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन बीड शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.






