“जय श्रीराम”रिंगटोनवरून विद्यार्थ्याला मारहाण.
शहर पोलीस ठाण्यात चौघा विरोधात तक्रार दाखल.

बीड, दि. २८ (प्रतिनिधी): शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मोबाईलवर “जय श्रीराम” रिंगटोन ठेवल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कार्तिक अशोक ढोले (विद्यार्थी) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, ते दि. २८ मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेले होते. सुमारे ११.३० वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर “जय श्रीराम” अशी रिंगटोन वाजली. त्यानंतर क्लास सुटल्यानंतर महाविद्यालयातील सय्यद अरशद अली हा त्यांच्याकडे आला आणि “तू ‘जय श्रीराम’ ही रिंगटोन का ठेवली आहेस?” असा जाब विचारला.
यानंतर सय्यद अरशद अली व त्याच्यासोबत असलेल्या अन्य तीन अनोळखी व्यक्तींनी ढोले यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेदरम्यान इतर विद्यार्थ्यांनी हस्तक्षेप करून ढोले यांची सुटका केली. मारहाणीनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी सय्यद अरशद अली व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.





