
बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील जालना रोडलगत असलेल्या एकता नगर परिसरात काम करत असताना विजेचा शॉक लागून दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.
दत्तात्रय लक्ष्मण आगलावे (वय 42, रा. लिंबगाव ता. जि. बीड) असे मृत कामगाराचे नाव आहे. 28 मार्च रोजी दुपारी सुमारे 3.30 वाजण्याच्या सुमारास ते एकता नगर येथे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर स्लायडिंग खिडक्यांचे माप घेण्याचे काम करत होते.
यावेळी बाहेरील खांबावरील विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्यांना जोराचा शॉक बसला आणि ते दुसऱ्या मजल्यावरून खाली जमिनीवर कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर त्यांना तत्काळ जालना रोडवरील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. तेथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे लिंबगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.





