
बीड (प्रतिनिधी) – केज तालुक्यातील साळेगाव शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ६ लाख २७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले, तर तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
दि. २४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, साळेगाव-केज रोडलगत एका शेतातील झुडपांमध्ये काही जण ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष अचानक छापा टाकला.
छाप्यात चार जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांची नावे सचिन भांगे, आजम सय्यद, धनराज घाटुळे व रोशन सरवदे अशी असून ते सर्व साळेगाव व परिसरातील रहिवासी आहेत. तर शेख अजिम, शेख मेहबूब व संजय मुंढे हे तिघे घटनास्थळावरून पळून गेले.
पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, तसेच चार दुचाकी वाहने असा एकूण ६.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळावरून पत्त्यांचे संच व रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांनच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश विघ्ने,पो.ह.महेश जोगदंड,पो.ह.गित्ते,चाल क गणेश मराडे यांनी केली.पुढील तपास सुरू असून पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.






