ब्रेकिंग न्यूज

मीना बाजारात मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई.

दामिनी पथकाने कारवाईत 19 टवाळखोर ताब्यात.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील मीना बाजार परिसरात मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर दामिनी पथकाने धडक कारवाई करत चांगलाच दणका दिला आहे. मागील चार दिवसांत एकूण १९ टवाळखोरांवर मुंबई पोलीस अधिनियम कलम ११०/११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दामिनी पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ मीना बाजारात धाव घेतली. साध्या वेशात गस्त घालत असताना काही टवाळखोर मुलींच्या मागे फिरणे, अश्लील हावभाव व इशारे करताना आढळून आले. संबंधितांना ताब्यात घेऊन बीड शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

तसेच बाजाराच्या बाहेरील परिसरातही काही जण संशयास्पद हालचाली करताना आढळले. त्यांनाही ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. या सर्वांवर कायदेशीर कारवाईसोबतच समुपदेशनही करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दामिनी पथकातील PSI पल्लवी जाधव, सहायक फौजदार मीरा रेडेकर, पोलीस हवालदार शोभा जाधव व चालक पोलीस शिपाई अक्षय जाधव यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

दरम्यान, बीड शहरातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस तसेच गर्दीच्या ठिकाणी तसेच धोंडीपुरा, नगर रोड, कारंजा रोड परिसरात दामिनी पथक ग्रस्त घालत असून कोणी टवाळखोर त्रास देत असेल तर दामिनी पथक प्रमुख पीएसआय पल्लवी जाधव यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button