पुन्हा बीड शहरात गुटखा करवाई.
६.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त;स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई.

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला. फुलाईनगर परिसरात कारमधून विक्रीसाठी गुटखा वाहतूक करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून कारसह एकूण ६ लाख ६८ हजार १८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलाईनगर येथे एक स्विफ्ट कार (क्र. MH-43/R-5725) मधून विविध कंपनींचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी नेला जात आहे.
या माहितीच्या आधारे आज १६ मार्च रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. छाप्यात भाऊसाहेब राम पडुळे (वय ३४, रा. औरंगपूर ता. जि. बीड, सध्या रा. स्वर्णनगरी, फुलाईनगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या स्विफ्ट कारमध्ये विविध कंपनींचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पोलिसांनी कारसह एकूण ६,६८,१८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
प्राथमिक चौकशीत हा गुटखा रेवन्नाथ चादर (रा. भाटसांगवी, ता. जि. बीड) याच्याकडून आणल्याचे पडुळे याने सांगितले असून तो सध्या फरार आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वात पोउपनि श्रीराम खटावकर, पोह राहुल शिंदे, युनुस बागवान, मपोह स्वाती मुंडे, पोअं अशपाक सय्यद, मनोज परजणे व चालक नितीन वडमारे यांनी संयुक्तपणे केली.
गेल्या आठ दिवसातील गुटखावर ही दुसरी कारवाई असून बीड जिल्ह्यात गुटखा येथे कुठून याच्या मुळाशी जाण्याची आज पोलिसांना गरज आहे.






