नेकनूर हद्दीत गावकऱ्यांनी चोरटा रंगेहात पकडला.
पोलिस-गावकऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची.

बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील उदंड वडगाव येथे ग्रामस्थांनी रसवंतीचे इंजिन चोरी करून नेत असलेल्या एका चोरट्याला रंगेहात पकडल्याची घटना घडली. या घटनेनंतर गावकऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले; मात्र त्यानंतर पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदंड वडगाव परिसरात एका व्यक्तीने रसवंतीचे इंजिन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना संशय आल्याने ग्रामस्थांनी त्याला अडवले. चौकशी केल्यानंतर तो चोरी करत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी त्याला पकडून ठेवले. या परिसरात यापूर्वीही रसवंतीची इंजिने चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
घटनेनंतर गावकऱ्यांनी नेकनूर पोलिसांना माहिती देत घटनास्थळी बोलावले. मात्र पोलिसांनी चोरट्याच्या बाजूने बोलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यामुळे काही काळ पोलिस आणि गावकऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे व्हिडिओमध्येही दिसून येत आहे.
दरम्यान, पकडलेल्या चोरट्याविरुद्ध कठोर कारवाई करावी तसेच परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.






