घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर;बीड शहरातील तीन हॉटेलवर छापा.
पुरवठा विभागाला आली अचानक जाग ! मोठ्या हॉटेलना सूट? छोट्या व्यवसायिकांवरच कारवाई; संबंधित एजन्सीवर कारवाई कधी?

बीड ( प्रतिनिधी)इराण-इजराइल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्वयंपाकाच्या गॅसची संभाव्य टंचाई लक्षात घेता घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे. बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तीन हॉटेलवर छापा टाकून घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. फक्त नगर रोडवरील हॉटेल कारवाई करण्यात आल्याने पुरवठा विभागाच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे.
घरगुती गॅस सर्वसामान्य ग्राहकांना उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलत व्यावसायिक वापरावर निर्बंध आणले आहेत. मात्र बीडमध्ये अनेक हॉटेल, खानावळ व धाब्यांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर होत असल्याचे चित्र आहे.
याच पार्श्वभूमीवर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील “श्री हॉटेल”, “समाधान हॉटेल” आणि “रायगड हॉटेल” येथे छापा टाकला. तपासणीदरम्यान या हॉटेलमध्ये नफेखोरीसाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे तिन्ही ठिकाणांहून सिलेंडर जप्त करण्यात आले.
या कारवाईत नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर, मंडळ अधिकारी अनिल तांदळे, तलाठी शब्बीर पठाण, तालुका पुरवठा विभागातील अव्वल कारकून श्रीराम वैभव व संतोष मुळीक यांनी सहभाग घेतला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
पुरवठा विभागाने स्पष्ट केले की गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अशा कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत.
दरम्यान, बीड शहरातील काही मोठ्या हॉटेलमध्येही घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचे दिसून येत असून बड्या हॉटेल्सवर कारवाई होत नसल्याबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. “मोठ्या हॉटेलना सूट आणि छोट्या व्यवसायिकांवरच कारवाई” अशी प्रतिक्रिया शहरात उमटत असून मोठ्या हॉटेलवरही समान कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
बीड शहरातील बार्शी रोड जालना रोड तसेच सर्व धावे हॉटेलवर घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर होत असून घरगुती सिलेंडर वापरणाऱ्या फक्त हॉटेलवर कारवाई न करता संबंधित गॅस एजन्सीवर देखील कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी नागरिकात होत आहे.






