वाळू वाहतुकीसाठी ५० हजारांची लाच घेताना ठाणेप्रमुख ACB च्या जाळ्यात.
API संदीप पाटील व पोलीस कर्मचारी सुरवसे एसीबीच्या जाळ्यात.

बीड, दि. १० (प्रतिनिधी) : अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी हप्ता घेतल्याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील आणि पोलीस कर्मचारी विनोद सुरवसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडल्याची घटना मंगळवारी (दि.१०) रात्री उघडकीस आली. या कारवाईमुळे बीड पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. संदीप पाटील बाबद हे गेल्या काही महिन्यापासून नागरिकांच्या व पत्रकारांच्या अनेक तक्रारी होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूचे वाहन बिनदिक्कत सुरू ठेवण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने दरमहा ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे हे पैसे स्वीकारण्यासाठी पोलीस कर्मचारी विनोद सुरवसे उमापूर पोलीस चौकीत उपस्थित होता.
दरम्यान, बीड एसीबीच्या पथकाने सापळा रचून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुरवसे याला रंगेहाथ ताब्यात घेतले.
ही कारवाई बीड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले , अमोल खरसाडे, महेंद्र बीडकर, प्रदीप सुरवसे, अंबादास पुरी, गणेश मेहेत्रे यांनी केली.
या प्रकरणात प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांनाही ताब्यात घेण्यात आले असून दोघांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. अवैध वाळू वाहतुकीला संरक्षण देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.







