बीड शहर पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा साठ्यावर छापा.
एक आरोपी ताब्यात;बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड (प्रतिनिधी) राज्य सरकारने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातलेली असतानाही बीड जिल्ह्यात गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. जिल्ह्यात छुप्या मार्गाने गुटखा आणला जात असल्याची माहिती मिळत असून शहरातील किराणा दुकाने, टपऱ्या व हॉटेलांवर तो सहज उपलब्ध होत असल्याचेही दिसून येत आहे.
दरम्यान, सोमवार दि. ९ मार्च रोजी दुपारी बीड स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, बीड शहर पोलीस स्टेशन हद्दीत BSNL टॉवर जवळ एका पत्र्याच्या शेडवर छापा मारून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा ठेवण्यात आला आहे. या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी अश्फाक शेख व मनोज परजणे यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला.
या कारवाईत सुमारे 1 लाख 61 हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी बीड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईत गुटख्याच्या मुद्देमालासह एका आरोपीस ताब्यात घेतले असून एक फरार झाला त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या पथकातील पो. गोविंद राख, पो इनुस बागवान,पो.हे.अंकुश वरपे,पो.मुंडे मॅडम, पो,हे.सलगर, पो.मनोज परजने,पो.अशपाक सय्यद, पो.हे. वडमारे यांनी केली.




