ब्रेकिंग न्यूज

हायवे रोडवर दरोडा टाकणाऱ्या टोळीवर “मिनी मकोका”.

पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची धडक करवाई.

बीड — जिल्ह्यातील वाढत्या चोरी, घरफोडी आणि दरोड्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

याच अनुषंगाने हायवे रोडवर दरोडा टाकणाऱ्या टोळीवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 111 अंतर्गत संघटित गुन्हेगारी अर्थात “मिनी MCOCA” लागू करण्यात आला आहे.

दि. 4 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादी शिवप्रसाद किशोरकुमार पौने (वय 32, रा. कल्पना सोसायटी, गणेशनगर, खुदबुल्लापूर, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) यांनी गेवराई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते कुटुंबासह खासगी कारने शिर्डीकडे दर्शनासाठी जात असताना रात्री सुमारे 12.30 वाजता शिवशारदा शाळेजवळ गाडी थांबवली. त्यावेळी चार अज्ञात आरोपींनी गाडीची चावी काढून गाडीचे नुकसान केले आणि लोखंडी रॉडने मारहाण करत धमकावून सुमारे 3 लाख 46 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले.

या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार करत आहेत. तपासादरम्यान या गुन्ह्यात एकूण सहा आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.

अटक आरोपींची नावे :

1) राहुल अनिल काळे (वय 19)

2)विकास अनिल काळे (वय 21)

3) अनिल रामा काळे (वय 40)(सर्व रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिवया तिघांना दि. 12 डिसेंबर 2025 रोजी अटक करण्यात आली. पोलीस कोठडीदरम्यान त्यांच्या ताब्यातून 4 लाख 29 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली सुमारे 10 लाख रुपये किंमतीची हेक्टर चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील इतर तीन आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

तपासात असेही निष्पन्न झाले की, या टोळीच्या प्रमुखाने संघटित पद्धतीने टोळी तयार करून बीड जिल्ह्यात पाच गंभीर गुन्हे केले आहेत. शस्त्रांचा धाक दाखवून आर्थिक फायद्यासाठी हे गुन्हे केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पोलीस ठाणे गेवराई गुन्हा क्रमांक 714/2025 मध्ये भारतीय न्याय संहिता कलम 309(6), 310(2), 324(4) सोबतच कलम 111 (संघटित गुन्हेगारी – मिनी MCOCA) लागू करण्यास परवानगी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पो.नि. किशोर पवार, सपोनि अण्णासाहेब पवार, पोलीस कर्मचारी कल्याण राठोड, कांबळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अभिमन्यू औताडे, बिबीषण चव्हाण आणि शेख अलीम यांचा सहभाग होता.

दरम्यान, भविष्यातही अशा संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का किंवा मिनी मोक्का सारखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button