धक्कादायक! शाळेचे गेट कोसळून विद्यार्थी जखमी.
मुख्याध्यापक व शिक्षकांचा निष्काळजीपणा;शाळेतील सुरक्षा रामभरोसे.

बीड (प्रतिनिधी): बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक घटना घडली असून शाळेचे लोखंडी गेट अचानक कोसळल्याने अर्शलान बागवान हा विद्यार्थी जखमी झाला आहे. जखमी विद्यार्थ्याला तातडीने बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थी गेट उघडण्यासाठी धावत गेले असता अचानक शाळेचे गेट कोसळले. या दुर्घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी विद्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
या घटनेमुळे शाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. गेटची अवस्था जीर्ण असतानाही त्याची दुरुस्ती किंवा सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याच्या जीवावर बेतण्याची वेळ आल्याची संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे. तसेच शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेचा तातडीने आढावा घेण्याचीही गरज व्यक्त केली जात आहे.




