नेकनूर मध्ये दोन टेम्पो भरून चोरीच्या दुचाकी सापडल्या.
17 चोरीच्या दुचाकीसह 63 दुचाकींचा सांगडा जप्त,गेवराई पोलिसांची नेकनूर मध्ये धडाकेबाज कारवाई.

बीड( प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेवराई पोलिसांनी नेकनूर येथे मोठी कारवाई करत दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दिनांक 4 मार्च गुरुवार रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नेकनूर पोलीस ठाणे आधी जाऊन चोरीच्या 17 दुचाकीसह तब्बल 63 दुचाकींचे सांगाडे आणि विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गोडाऊनमध्ये गेवराई पोलिसांनी छापा टाकला. छाप्यातून दोन आयशर टेम्पो भरून दुचाकी आणि विविध पार्ट्स ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणी चोरीच्या दुचाकी आणून काही वेळातच त्यांचे सुटे पार्ट्स करून वेगवेगळे केले जात होते. त्यानंतर काही पार्ट्स आणि मॉडीफाय केलेल्या दुचाकींची विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे नेकनूर पोलीस ठाण्यातील एका होमगार्डचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे पोलिस विभागातही खळबळ उडाली असून, स्थानिक पोलिसांनी या रॅकेटकडे दुर्लक्ष केले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या दुचाकी चोरीच्या रॅकेटचे धागेदोरे संभाजीनगरपर्यंत असल्याचीही चर्चा आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. गेवराई पोलीस निरीक्षकांनी नेकनुर पोलीस ठाणे हद्दीत येऊन मोठी कारवाई केल्याने नेकनूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार व डीबी पथकाने केली.
या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या मोठ्या नेटवर्कचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




