दहा लाखाचा गांजा जप्त.
एक आरोपी ताब्यात; सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांची धडक कारवाई.

बीड(प्रतिनिधी)अंबाजोगाई उपविभागातील बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत पोलिसांनी सुमारे 33 किलो 360 ग्रॅम गांजा जप्त केला असून या प्रकरणी एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे, तर आणखी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या गांज्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे 10 लाख 800 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, 4 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.20 वाजण्याच्या सुमारास मुर्ती फाटा, पट्टीवडगाव रोडलगत धर्मापुरी (ता. परळी) येथील शेतातील कच्च्या विटांच्या खोलीत पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत दोन पांढऱ्या रंगाच्या पोत्यांमध्ये ओलसर व उग्र वास येणारा पान, फुल, बिया व बोंडे असलेला दाबलेला गांजा आढळून आला.
तपासणीदरम्यान एका पोत्याचे वजन 24 किलो 560 ग्रॅम तर दुसऱ्या पोत्याचे वजन 8 किलो 800 ग्रॅम असे एकूण 33 किलो 360 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. बाजारभावानुसार प्रति किलो 30 हजार रुपये दराने त्याची एकूण किंमत अंदाजे 10,00,800 रुपये इतकी ठरविण्यात आली.
दोन्ही पोत्यांमधून पंचांसमक्ष फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रत्येकी 200 ग्रॅम असे एकूण 400 ग्रॅम नमुने काढून ते सील करून पुढील तपासासाठी जप्त करण्यात आले. उर्वरित गांजा पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत सील करून जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतला.
या कारवाईदरम्यान नितीन लिंबाजी कांदे (वय 30, रा. कांदेवाडी ता. अंबाजोगाई) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गांजा भाऊसाहेब चौधरी (रा. कडा ता. आष्टी) याच्यासह आणल्याचे सांगितले असून तो बबलू उर्फ व्यंकटेश भास्कर फड (रा. धर्मापुरी ता. परळी) याच्या सांगण्यावरून विक्रीसाठी मागविल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी नितीन लिंबाजी कांदे, भाऊसाहेब चौधरी आणि बबलू उर्फ व्यंकटेश भास्कर फड यांच्याविरुद्ध NDPS कायद्याच्या कलम 8(क), 20 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे (उपविभाग अंबाजोगाई) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे,पोलीस उपनिरीक्षक घुले,पोह महादेव आवले, खरटमल मुंडे तसेच बर्दापूर पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी सहभाग घेतला.




