ब्रेकिंग न्यूज

घरफोडी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात.

पाठलाग करत सिनेस्टाईल केले जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड पाटोदा पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी तब्बल दोन लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

पाटोदा पोलिस ठाण्यात गु.र.नं. 45/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 331(2) व 305 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि पाटोदा पोलिसांकडून सुरू होता.

दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे महत्त्वाची माहिती मिळाली. ज्योतीराम शरद भोसले (वय 25, रा. खांडवी ता. जामखेड जि. आहिल्यानगर), राहुल काशिनाथ पवार (वय 20, रा. घोडेगाव ता. जामखेड) आणि बनेश बाबुशा भोसले (वय 20, रा. खांडवी ता. जामखेड) यांनी हा गुन्हा केल्याची माहिती समोर आली. तसेच हे आरोपी पाटोदा मार्गे जामखेडकडे जाणार असल्याचेही समजले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक खटावकर यांच्या पथकाने तात्काळ हालचाल करत पाटोदा परिसरात सापळा रचला. दरम्यान आरोपी मोटारसायकलवरून साकत मार्गे जामखेडकडे निघाल्याचे समजताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. अखेर महासांगवी (ता. जि. बीड) येथील शिवारात शिताफीने कारवाई करत आरोपीस ताब्यात घेण्यात आले.

पोलिसी चौकशीत आरोपींनी घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी दोन लाख रुपयांची रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ही धडक कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पो.उप.नि खटावकर, पोहेकॉ.सोमनाथ गायकवाड,राहुल शिंदे, बाळू सानप तसेच पोलिस अंमलदार अर्जुन यादव, मनोज परझणे, अशफाक सय्यद, चापोह वडमारे आणि मांजरे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button