
बीड( प्रतिनिधी)बीड शहरातील जालना रोड परिसरात रविवारी (दि. २२ फेब्रुवारी) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.एका हॉटेलच्या बाजूला नवीन मोंढा रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुलेट मोटारसायकलने ॲक्सेस दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघात इतका जोरात होता की ॲक्सेसवरील व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृत व्यक्ती नामगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त लवकरच देण्यात येईल.










