ब्रेकिंग न्यूज

बार्शी रोडवर वाहतूक कोंडीचा कहर;नागरिक हैराण.

रोजच दोन/तीन तास वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकात संताप.

बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे गेल्या काही महिन्यांपासून वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. रविवारी तर सलग दोन तासांहून अधिक काळ वाहनांच्या तेलगाव नाका बार्शी नाका ते मुक्ता लॉन्स पर्यंत लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

रस्त्याचे काम सुरू असताना योग्य पर्यायी मार्ग, वळणांचे नियोजन किंवा सूचना फलक नसल्याने वाहनचालक गोंधळून जात आहेत. परिणामी थोड्याच वेळात वाहतूक ठप्प होते. स्थानिकांकडून वारंवार तक्रारी करूनही बीड पोलीस व वाहतूक शाखेकडून पुरेसे मनुष्यबळ तैनात केले जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

बार्शी नाका चौकात रस्त्याच्या कडेला हॉटेल, दुकानासमोर दुचाकी लावल्याने,हातगाडे, वडापाव व फळ विक्रेत्यांच्या गाड्या उभ्या राहत असल्याने रस्ता आणखी अरुंद होतो. आधीच कामामुळे कमी झालेली जागा आणि त्यात या गाड्यांची भर पडल्याने दररोजच कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

 सध्या दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने या वाहतूक कोंडीचा सामना विद्यार्थ्यांना देखील करावा लागत आहे. तसेच एखादा अपघात ग्रस्ताला किंवा रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे तात्काळ पोलिसांनी व बांधकाम विभागाने उपाययोजना कराव्यात.

नागरिकांच्या मते, सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू करताना वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसत आहे. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे दुकानदार आणि रहिवाशांनाही त्रास सहन करावा लागत असून नियमित पाणी मारावे, अशीही मागणी पुढे येत आहे.

बार्शी नाका पोलीस चौकी येथे चोवीस तास वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी नियुक्त करावेत, अतिक्रमण हटवावे आणि तातडीने नियोजन करावे, अशी जोरदार मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे. योग्य उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही युवा नेते दिपक पवार यांनी दिला आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button