अवैध गुटखा व देशी दारू विकणारावर करवाई.
अवैध गुटखा व दारू जप्त,दोघे ताब्यात बीड ग्रामीण पोलिसांची करवाई.

बीड (प्रतिनिधी) – बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई करत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून प्रतिबंधित गुटखा व देशी दारू जप्त केली आहे. या दोन्ही कारवायांमुळे बेकायदेशीर विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त.
दि. 03 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5.40 वाजता पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज हे पथकासह बीड ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग करत असताना खात्रीलायक माहिती मिळाली. त्यावरून माऊली पान सेंटर, बार्शी रोडजवळ समनापुर शिवार (ता. जि. बीड) येथे छापा टाकण्यात आला.
तेथे चंद्रकांत बाळाराम कांबळे (रा. बार्शी रोड, बीड) याच्याकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाल्याचा साठा आढळून आला. यात हिरा पान मसाला, केसरयुक्त विमल, गोवा 1000, बायोबाजी, प्रिमियम राजनिवास सुगंधित पान मसाला, रॉयल 220 टोबॅको, प्रिमियम ZN-01 जाफरानी जर्दा, रॉयल 717 टोबॅको, V-1 तंबाखू आदी विविध ब्रँडचा साठा होता.
एकूण ₹44,695 किमतीचा माल विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेला असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस हवालदार मनोज जोगदंड यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. 42/2026 दाखल करण्यात आला असून भा.न्या.संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
देशी दारूसह आरोपी ताब्यात
त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सुमारे 6.30 वाजता दुसरी कारवाई करण्यात आली. कोल्हारवाडी शिवार, मंजूरभाई यांच्या विटभट्टीजवळील पानटपरीच्या पाठीमागे छापा टाकण्यात आला.
येथे आजिनाथ मारोती वडमारे (रा. बार्शी नाका, बीड) याच्याकडे देशी दारूच्या 90 मि.ली.च्या 146 बाटल्या विनापरवाना विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळले. जप्त दारूची किंमत ₹7,300 असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पोलीस हवालदार नामदेव सानप यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. 43/2026 दाखल करण्यात आला असून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दोन्ही कारवाया या पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवारयांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.कारवाईत पोनि अशोक मुदिराज, पो.ह. मनोज जोगदंड, पो.ह. नामदेव सानप, पो.अ. संतोष कोटुळे व ग्रेड पोउपनि चव्हाण यांनी सहभाग घेतला.
बीड ग्रामीण पोलिसांनी इशारा दिला असून, हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.




