गुटखा वाहतूक करणारी स्कॉर्पिओ पकडली.
14 लाखांचा मुद्देमाल जप्त;डीवायएसपी पूजा पवार यांची करवाई.

बीड(प्रतिनिधी) महाराष्ट्रात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असतानाही जिल्ह्यात त्याची चोरटी वाहतूक सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी पकडून सुमारे १३ लाख ७४ हजार १४० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला.
ही कारवाई दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता महालक्ष्मी चौक, धुळे–सोलापूर रोड परिसरात करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या आदेशानुसार पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून MH-23 AS-5522 क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी थांबविण्यात आली.
गाडी थांबताच एक संशयित इसम पळून गेला, तर चालक लक्ष्मण राधाकिसन खांडे (रा. मळसजवळा, ता. जि. बीड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पंचांसमक्ष गाडीची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये खालील ब्रँडचा समावेश आहे:
हिरा पान मसाला,केसरयुक्त विमल पान मसाला,रॉयल 220 टोबॅको,V-1 तंबाखू
हा सर्व माल बेकायदेशीर विक्रीसाठी वाहतूक केला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रसाद बाबासाहेब कदम यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 45/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 123, 223, 274, 275 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी पूजा पवार, आणि पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि काटकर, पोह प्रसाद कदम, पोअ सचिन आगलावे यांनी केली.
दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या गुटखा तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.




