जागेचा मावेजा न मिळ्यांने अंगावर पेट्रोल ओतून घेतले.
धानोरा रोड भूसंपादन रखडल्याने आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला.

बीड (प्रतिनिधी) – धानोरा रोडवरील रखडलेल्या भूसंपादन प्रक्रियेच्या निषेधार्थ दोन नागरिकांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याने बीड शहरात एकच खळबळ उडाली. सतीश क्षीरसागर व देवा जोगदंड यांनी प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात संताप व्यक्त करत आत्मदहनाचा प्रयत्न केला; मात्र अधिकाऱ्यांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच बीड नगर परिषदेचे अभियंता किरण देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे बीड (पश्चिम) जिल्हाध्यक्ष अजय सरवदे तसेच शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी रवी आघाव यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधितांशी समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती चिघळण्याआधीच शांत झाली.
धानोरा रोडचे काम सुरू असताना भूसंपादन प्रक्रियेतील विलंबामुळे बाधित नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रक्रियेमुळे स्थानिकांमध्ये असंतोष वाढत असून, याच पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांना आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी टोकाच्या मार्गाचा विचार करावा लागतो, ही बाब गंभीर असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. संबंधित भूसंपादन प्रक्रिया तात्काळ सुरू करून बाधितांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.



