बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार.
बीडची बारामती होण्याचे स्वप्न बीड वासियांचे साकार होणार का ?

बीड : दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्य सरकारने नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे बीडसह पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अधिकृतपणे सोपवली आहे.
सुनेत्रा पवार यांनी चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर बीडचे पालकतत्व नेमके कुणाकडे जाणार, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात होते. धनंजय मुंडे पुन्हा बीडचे पालकमंत्री राहणार का, की पंकजा मुंडे यांना ही जबाबदारी दिली जाणार, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. यासोबतच लातूरचे बाबासाहेब पाटील यांचे नावही शर्यतीत होते.
मात्र मंगळवारी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्व अंदाज फोल ठरले असून, थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे बीडच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय किती निर्णायक ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिवंगत अजित पवार यांचे “बीडला बारामती करण्याचे” स्वप्न सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षात उतरणार का,? आणि बीड जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.



