ब्रेकिंग न्यूज

पेठ बीड भागात लोखंडी रॉडने तरुणावर हल्ला.

डोक्याला गंभीर दुखापत;दिवसभरात दोन हल्ल्यांच्या घटनांनी नागरिकांत भीतीचे वातावरण.

बीड(प्रतिनिधी) बीड शहरातील पेठ बीड परिसरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असून,पेठ बीड ठाणे प्रमुखांचा गुन्हेगारावर वचक राहिला नसल्याचे दिसत आहे.

गांधी नगर भागात मंगळवारी रात्री एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख अरबाज (वय २८, रा. गांधीनगर) हा व्यवसायाने पेंटर असून त्याने शेख वसीम उर्फ राजा याच्या घराचे रंगकाम केले होते. कामाचे उर्वरित पैसे मागण्यासाठी अरबाज गेला असता वाद निर्माण झाला. या वादातून वसीम उर्फ राजा याच्यासह अन्य दोघांनी अरबाजवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत अरबाज गंभीर जखमी झाला असून बीड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेपूर्वी दुपारच्या सुमारास याच भागात एका विद्यार्थ्यावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे पेठ बीड परिसरात एका दिवसात दोन हिंसक हल्ल्यांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात खून व हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पेठ बीड परिसरात पोलिसांचा वचक कमी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, महाविद्यालय परिसर आणि गर्दीच्या भागात पोलिस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.

या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास  पेठ बीड पोलीस करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button