शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 19 वर्षीय तरुणीकडून खोटी तक्रार.
मुलीने अत्याचाराचा काल्पनिक बनाव उघड;रिक्षा चालकाला मात्र नाहक त्रास.

बीड (प्रतिनिधी) बीड दि.30: शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीवर चालत्या रिक्षामध्ये लैंगिक छेडछाड आणि अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची तक्रार 26 नोव्हेंबर 2025 रोजी दाखल झाल्याने बीड जिल्हा हादरून गेला होता.
त्यावर शिवाजीनगर पोलिसांनी माने कॉम्प्लेक्स परिसरातील तसेच बीड शहरातील बस स्थानक व इतर ठिकाणची सीसीटीव्ही तपासून रिक्षा चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते मात्र शिवाजीनगर पोलिसाच्या तपासात हे धक्कादायक प्रकरण एक काल्पनिक बनाव असल्याचे उघड झाले आहे.
दिलेल्या तक्रारीत तरुणीने म्हटले होते की, दुपारी 4 वाजता क्लासवरून घरी जाताना रिक्षा चालकाने तिला नगर रोडवरील निर्जनस्थळी नेले. तिथे रिक्षातील एका सहप्रवाशाने तिचे तोंड दाबून अत्याचाराचा प्रयत्न केला आणि विरोध केल्यावर तिला मारहाण केली. या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी तातडीने पथकासह तपास सुरू केला. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना अनेक विसंगती आढळल्या. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पीडितेने सांगितलेल्या वेळेत ती रिक्षातून थेट आपल्या घराच्या दिशेने जाताना दिसली, तसेच तिने सांगितलेल्या घटनास्थळाचा कोणताही पुरावा पोलिसांना मिळाला नाही. वारंवार विचारणा करूनही तिला नेमके ठिकाण सांगता येत नव्हते. त्यामुळे संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचा आधार घेऊन तरुणीला विश्वासात घेऊन पुन्हा विचारपूस केली. अखेर तिने हा सर्व प्रकार काल्पनिक असल्याचे कबूल केले. तिने जबाबात सांगितले की, काही दिवसांपूर्वी मी मालेगाव येथे एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याची बातमी वाचली होती. घरी जाताना माझ्या डोक्यात सतत त्याच बातमीचा विचार सुरू होता. मी घरी गेल्यावर रडत रडत घरच्यांना खोटेच सांगितले की, माझ्यासोबत असे घडले आहे. माझ्या रडण्यामुळे घरच्यांचाही विश्वास बसला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. त्यानंतर तिने ही सर्व स्टोरी रचल्याचे उघड झाले. अखेर सत्य समोर आल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपास केल्याने रिक्षाचालकावर खोटा गुन्हा दाखल होण्यापासून सुटका मिळाली. या तपासात प्रामुख्याने पो.रवी आघाव यांनी सखोल तपास व चौकशी करून सत्य समोर आणले.







