ब्रेकिंग न्यूज

माजलगावात सराफा व्यापाऱ्यावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद.

30 लाखांचा मुद्देमाल जप्त,बीड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

बीड (प्रतिनिधी)माजलगाव येथे सराफा व्यापाऱ्यावर टाकण्यात आलेल्या सुमारे ६० लाखांच्या दरोड्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अल्पावधीत उघड करत चार आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून १८ तोळे सोने व १ किलो चांदी असा सुमारे ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका आरोपीचा शोध सुरू आहे.

दि. २५ जानेवारी २०२६ रोजी माजलगाव येथील अमोल पंढरीनाथ गायके (वय ३१, रा. भाट वडगाव ता. माजलगाव) हे त्यांच्या “अमोल सोन्याचे दुकान” मधील सोन्या–चांदीचे दागिने विक्रीसाठी आठवडी बाजार, खेर्डा येथे जात असताना हा प्रकार घडला. गायके हे त्यांच्या पुतण्यासोबत हिरो होंडा पॅशन मोटारसायकलवर जात असताना पाठीमागून स्प्लेंडर मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी त्यांना जबरदस्तीने थांबवले. धारदार शस्त्राचा धाक दाखवत दागिन्यांची पिशवी हिसकावून आरोपी पळून गेले. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४), १२६ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बीडचे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तीन स्वतंत्र पथके तयार करून तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासात आरोपींनी दोन मोटारसायकलींचा वापर करून रेकी केली व प्रवासादरम्यान एकमेकांची अदलाबदल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बीड येथील शांताई हॉटेलच्या पाठीमागील गल्लीत छापा टाकून पोलिसांनी

1)एकनाथ ऊर्फ नारायण अरुण कपाले (वय ३५, रा. पाटोदा ता. परतूर जि. जालना, ह.मु. बीड),

2) कृष्णा तुकाराम निरडे (वय २२, रा. पावर हाऊस रोड, माजलगाव),3)अभिषेक अशोक शिंदे (वय २२, रा. पावर हाऊस रोड, माजलगाव)

यांना ताब्यात घेतले.

चौकशीत एकनाथ कपाले हा सोनार कारागीर असल्याचे समोर आले. त्याने पूर्वी माजलगावमध्ये काम केल्याने स्थानिक सराफा व्यापाऱ्यांच्या हालचालींची माहिती मिळवली होती. कर्जबाजारी झाल्यामुळे त्यानेच दरोड्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. त्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार कृष्णा निरडे व अभिषेक शिंदे यांना सहभागी करून घेतले. पुढे संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे (वय २८, रा. उमरगा मन्ना ता. उदगीर जि. लातूर, ह.मु. पुणे) व विशाल सूर्यकांत सुळ (रा. माजलगाव, ह.मु. पुणे) यांनाही कटात सामील करण्यात आले.

घटनेच्या दिवशी आरोपींनी स्प्लेंडर व बजाज पल्सर या दोन मोटारसायकलींवर पाठलाग करून दरोडा टाकल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी आरोपींकडून १८ तोळे सोन्याचे दागिने व १ किलो चांदी असा एकूण ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संजीव कांबळे यालाही ताब्यात घेण्यात आले असून एकूण चार आरोपींना अटक झाली आहे. एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पांडव (माजलगाव ग्रामीण) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, महेश विघ्ने तसेच स्थानिक गुन्हे शाखा व TAC सेलच्या पथकाने पार पाडली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button