ब्रेकिंग न्यूज

लॉज मध्ये चालत असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा.

दोन पीडित महिलांची सुटका ;AHTU व परळी ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई.

परळी (प्रतिनिधी) — अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) बीड व परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने साई लॉज, टोकवाडी (परळी–बीड रोड) येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी AHTU च्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव व परळी ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक सदानंद मेंडके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संबंधित लॉजमध्ये बाहेरील जिल्ह्यांतून महिलांना बोलावून देहविक्री व्यवसाय चालवला जात आहे. माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मझहरअली सय्यद यांना AHTU पथकासोबत कारवाईचे आदेश देण्यात आले.

पोलिसांनी डमी ग्राहक व दोन पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. डमी ग्राहकाने संपर्क साधल्यानंतर एजंटने वेश्या गमनासाठी १,५०० रुपयांची मागणी केली. ठरल्याप्रमाणे पैसे दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून एजंट नाशर नशीर शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पंचांसमक्ष ५०० रुपयांच्या तीन नोटा जप्त करण्यात आल्या.

छाप्यात दोन पीडित महिला आढळून आल्या. त्यापैकी एक महिला भिवंडी (जि. ठाणे) येथील असून तिला दत्ता अंतराम मुंडे याने बोलावून घेतल्याचे तिने सांगितले. दुसरी महिला पुणे येथील आहे. ग्राहकाकडून १,५०० रुपये घेऊन त्यापैकी ५०० रुपये महिलांना दिले जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. लॉज व्यवस्थापक सोमनाथ ज्ञानोबा मुंडे (रा. टोकवाडी) याचाही या प्रकारात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. खोलीच्या झडतीत सहा न वापरलेले निरोध जप्त करण्यात आले.

या प्रकरणी नाशर नशीर शेख (एजंट), सोमनाथ ज्ञानोबा मुंडे (व्यवस्थापक) व दत्ता अंतराम मुंडे (रा. कन्हेरवाडी, ता. परळी, जि. बीड) यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) कायदा १९५६ च्या कलम ३, ४, ५ व ६ अन्वये परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही पीडित महिलांची सुटका करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

बीड शहरातील काही लॉजवर देखील वेश्या व्यवसाय व अल्पवयीन जोडप्यांना रूम देत असल्याची माहिती मिळत असून अशा लॉजवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे 

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व चेतना तिडके, तसेच सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे (अंबाजोगाई उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक मझहरअली सय्यद, API सदानंद मेंडके, PSI पल्लवी जाधव, PSI अंकुश निमोने, महिला पोलीस हवालदार उषा चौरे व परळी ग्रामीण पोलीस ठाणे व AHTU पथकातील अधिकारी-कर्मचारी सहभागी होते.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button