नाथापूर मध्ये दोन गटांत वादातून आरपीआय नेत्याच्या घरावर जमावाचा हल्ला.
दगडफेक व मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल;दिपक केदार यांनी घेतली जखमींची भेट.

बीड (प्रतिनिधी)बीड तालुक्यातील नाथापूर येथे दोन गटांतील जुन्या वादाचे रूपांतर गंभीर हिंसक घटनेत झाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे पिंपळनेर सर्कल प्रमुख सतीश शिनगारे यांच्या घरावर तब्बल ५० ते ६० जणांच्या जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या हल्ल्यात घरावर जोरदार दगडफेक करण्यात आली असून, जमावाने घरात घुसून महिला व लहान मुलांसह कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हल्ल्यावेळी जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही सांगण्यात येत आहे.
जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार
हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते दीपक केदार यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांनी पिंपळनेर पोलिसांशी संपर्क साधून दोषींवर तात्काळ कारवाई करून अटक करण्याची मागणी केली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नाथापूर परिसरात दोन गटांतून दीर्घकाळापासून वाद सुरू होता. गुरुवारी या वादाने उग्र स्वरूप धारण करत हिंसक जमाव सतीश शिनगारे यांच्या निवासस्थानी पोहोचला. जमावाने दगडफेक करत घरात प्रवेश केला आणि कुटुंबीयांवर हल्ला केला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
जातीय घोषणाबाजीमुळे तणाव
हल्ल्यावेळी जमावाकडून जातीय घोषणाबाजी व अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दलित समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दीपक केदार जिल्हा रुग्णालयात दाखल :
या घटनेची माहिती मिळताच दरीत पॅंथरचे दीपक केदार यांनी बीड जिल्हा जखमीची भेट घेत पिंपळनेर पोलीस निरीक्षकांना याची माहिती देत तत्काळ आरोपींना अटक करावी अशी मागणी केली.
दरम्यान, या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये जमावाचा आक्रमकपणा स्पष्टपणे दिसून येतो. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे.







