अर्चना सुरेश कुटेला बीडकडे घेऊन येताना पोलीस व्हॅनचा भीषण अपघात.
अपघाताचा सीसीटीव्ही व्हायरल;दुचाकीस्वार गंभीर जखमी.

बीड(प्रतिनिधी)बीड सह महाराष्ट्रात ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याने अटकेत असलेले मुख्य आरोपी सुरेश कुटे व त्यांची पत्नी अर्चना कुटे यांना केज येथून बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी पोलीस व्हॅनने आणत असताना नेकनूर–येळंब मार्गावर शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस वाहनाची समोरून येणाऱ्या मोटरसायकलशी जोरदार धडक झाली.
या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय अक्षरशः तुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, पोलीस ताब्यात असलेल्या अर्चना कुटे यांनाही या अपघातात दुखापत झाली असून त्यांच्यावर वैद्यकीय तपासणी करून उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. आरोपी सुरेश कुटे यांना मात्र कोणतीही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे काही काळ नेकनूर–येळंब रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.
अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात येत असून वेग, रस्त्याची अवस्था किंवा निष्काळजीपणा यापैकी नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे. आरोपींच्या पोलीस बंदोबस्तातील प्रवासादरम्यान झालेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.







