ब्रेकिंग न्यूज

जीएसटीचे राज्य कर अधिकारी सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृतदेह आढळला.

आत्महत्या की घातपात ? संशयास्पद मृत्यूने बीड हादरले.

बीड (प्रतिनिधी) : बीड येथील जीएसटी कार्यालयातील राज्य कर अधिकारी सचिन नारायण जाधवर (वय ३५) हे ड्युटीला म्हणून घराबाहेर पडून परत न आल्याने त्यांची बेपत्ता तक्रार नोंदवली गेली होती. मात्र काही तासांतच त्यांचा मृतदेह कपिलधार रोडवरील कमानीजवळ उभ्या असलेल्या त्यांच्या कारमध्ये आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सचिन जाधवर हे मूळचे चुंब (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील असून सध्या बीड शहरातील शिवाजीनगर परिसरात वास्तव्यास होते. ते बीड जीएसटी कार्यालयात राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत होते. काल ड्युटीनंतरही ते घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत होते. रात्रभर संपर्क न झाल्याने आज सकाळी त्यांच्या पत्नीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कपिलधार रोडवरील कमान परिसरात त्यांची कार संशयास्पद स्थितीत उभी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गाडी उघडून पाहणी केली असता आतमध्ये सचिन जाधवर यांचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच शिवाजीनगर व बीड ग्रामीण पोलीस व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून प्राथमिकदृष्ट्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून मोबाईल कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. परंतु अधिकाऱ्याचा मृतदेह असा कार मध्ये आढळल्याने आत्महत्या की घातपात? याची चर्चा शहरभर पसरली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button