ब्रेकिंग न्यूज

बेपत्ता मुलीच्या शोधासाठी व्याकूळ आई-वडिलांचे एसपी कार्यालयासमोर उपोषण.

पिंपळनेर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह;तपास PSI पल्लवी जाधव यांच्याकडे.

बीड (प्रतिनिधी)पिंपळनेर पोलीस ठाणे मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरत असून ठाणे प्रमुख व कर्मचाऱ्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे. ठाणे हद्दीत अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याच्याही तक्रारी आहेत.

बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत साडेतीन महिन्यांपूर्वी गावातील एका तरुणाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल असतानाही अद्याप मुलीचा शोध लागलेला नाही. वारंवार चौकशी करूनही पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप पीडित पालकांनी केला आहे. पिंपळनेर पोलिसावर रोष व्यक्त करत पोलीस अधीक्षक कार्यालय समोर पीडित मुलीचे कुटुंबीय उपोषणास बसले.

“आमची मुलगी जिवंत आहे की तिचे काही बरेवाईट झाले आहे,” या भीतीने व्याकूळ झालेल्या आई-वडिलांनी न्यायाच्या मागणीसाठी आज सोमवार (दि. ५) पासून बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. यावेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती.

उपोषणाची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास पिंपळनेर पोलिसांकडून काढून घेऊन PSI पल्लवी जाधव यांच्याकडे सोपवला आहे. या निर्णयामुळे पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    आता पोलीस प्रशासन बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेऊन पीडित कुटुंबाला न्याय देणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button