बसस्टँड व सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील रॉबरी,मोबाईल चोरी करणारा अटक.
बीड शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील बसस्टँड व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात मागील काही महिन्यांपासून सातत्याने मोबाईल चोरी, जबरी चोरी, नागरिकांना अडवून बळजबरी पैसे काढून घेणे, खिशातून पैसे लंपास करणे, मारहाण तसेच खून प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीस बीड शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने शिताफीने अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिपक संतोष भोरे (रा. खडकपुरा पेठ, बीड) असे असून त्याच्यावर यापूर्वीही खून, मारामारी, जबरी चोरी व चोरीसह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. हा आरोपी विशेषतः गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी—बसस्टँड व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात—मोबाईल चोरी व जबरी चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
बीड शहरात गुन्हे करून आरोपी नाशिक येथे पळून जाऊन वास्तव्य करत होता. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बीड शहर पोलिसांच्या डीबी पथकाने त्याचा माग काढत अटक केली. या कारवाईमुळे संबंधित परिसरातील चोरी व जबरी चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपींवर तडीपारीसारखी कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिल्या आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप आघाव, मनोज जायभाय तसेच पोलीस अंमलदार गहिनीनाथ बावनकर, इलियास शेख, राम पवार व मंगेश शिंदे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.







