भरदिवसा अपहरण झालेल्या तरुणीचा अवघ्या सहा तासांत शोध.
गेवराई पोलिसांच्या तत्परतेने पुढील अनर्थ टळला;आरोपीचा शोध सुरू.

बीड (प्रतिनिधी)गेवराई शहरात भरदिवसा तरुणीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी (दि. १८ डिसेंबर २०२५) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेमुळे गेवराई शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, गेवराई पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अपहरण झालेल्या तरुणीचा शोध घेऊन तिला सुखरूप मुक्त केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
गेवराई पंचायत समिती परिसरातील चौकातून भर दिवसा तरुणीचे अपहरण करण्यात आले होते.हा अपहरणाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन युवक अल्टो कारमध्ये येऊन तरुणीला जबरदस्तीने गाडीत टाकून नेताना स्पष्टपणे दिसत होते.या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तात्काळ दखल घेत पाच विशेष पथके रवाना केली. संबंधित अल्टो कारचा शोध घेण्यासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आली तसेच संपूर्ण बीड जिल्हा व इतर संभाव्य ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असतानाच पोलिसांना अपहरणकर्ते तरुणीला घेऊन परभणी जिल्ह्याच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथक तात्काळ परभणी येथे रवाना झाले. तेथील सीसीटीव्ही फुटेज व स्थानिक नागरिकांकडून माहिती घेतली असता संबंधित अल्टो कार निदर्शनास आली. पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग केला असता अपहरणकर्त्यांनी तरुणीला रस्त्यात सोडून पळ काढल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत अपहरण झालेली तरुणी पूर्णपणे सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी अपहरणकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास वेगाने सुरू आहे.
दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असला, तरी गेवराई पोलिसांनी अवघ्या सहा तासांत केलेल्या यशस्वी कारवाईमुळे सर्व स्तरातून पोलिसांचे कौतुक होत आहे.




