
पाटोदा – (महेश बेदरे )पाटोदा तालुक्यातील ढाळेवाडी येथे दिनांक १५ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा बिबट्याची दहशत समोर आली असून ढाळेवाडी येथील शेतकरी शामराव रामभाऊ वाळेकर यांच्या शेतात बिबट्याने शेळीवर हल्ला करून तिचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे.
शेतात शेळ्यांना चारण्यासाठी गेले असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका शेळीवर झडप घातली, हा प्रकार पाहताच शेतकरी वाळेकर घाबरून गावात पळाले व त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली, तोपर्यंत बिबट्याने शेळी ठार करून घटनास्थळावरून पळ काढला होता. या घटनेची माहिती पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती तात्यासाहेब हुले यांनी आमदार सुरेश धस यांना दिल्यानंतर आमदार धस यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून पंचनामा करण्याचे आदेश दिले. ढाळेवाडी व परिसरात वारंवार बिबट्याचा वावर दिसून येत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.




