नगर रोड–राजीव गांधी चौकातील अतिक्रमण हटवले.
बीड शहर वाहतूक पोलिस व न.प. कर्मचाऱ्यांची संयुक्त कारवाई.

बीड (प्रतिनिधी):बीड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नगर रोड व राजीव गांधी चौक परिसरात वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यात आली. बीड शहर वाहतूक पोलीस आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
बीड शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे वाहतूक समस्या गंभीर बनली होती. विशेषतः नगर रोडवर शासकीय कार्यालये असल्याने नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र या रस्त्यावर दुकानांच्या पाट्या, होल्डिंग, खुर्च्या तसेच इतर साहित्य रस्त्यावर ठेवल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच जुना नगर नाका ते राजीव गांधी चौक दरम्यान भाजीपाला विक्रेते, वडापाव गाडे व इतर फेरीवाल्यांनी रस्त्यालगत अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेत आज बीड शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सानप व बीड नगरपालिका कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत नगर रोड व राजीव गांधी चौक परिसरातील अतिक्रमणे हटवली. या कारवाईमुळे संबंधित रस्ता मोकळा झाला असून नागरिक व वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
ही कारवाई जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी सुभाष सानप, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, पोलीस हवालदार राहुल गायकवाड,पोलीस अंमलदार वसीम शेख, विनायक गाडे, मोहन बनसोडे पोलीस ड्रायव्हर चालक नारायण वाघमारे पोलीस हवलदार चालक संतोष हारके अतिक्रमण पथक प्रमुख मुन्ना गायकवाड यांच्यासह पवन लाहोट, सुजित जाधव, लखन तुसांबड, किरण भिसे, अविनाश डूलगच व विकी गगाट यांनी केली.
भविष्यात पुन्हा अतिक्रमण आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस निरीक्षक सानप व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणधारकांना दिला आहे.




