बीड शहरात दिवसाढवळ्या चैन स्नॅचिंग.
महिलांमध्ये भीतीचे वातावरण;शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

बीड( प्रतिनिधी)बीड शहरात दिवसाढवळ्या चेन स्नॅचिंगची धक्कादायक घटना घडल्याने शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड शहरातील अंबिका नगर, बीड येथील रहिवासी सुनिता प्रेमचंद गायकवाड (वय ५८) या बार्शी रोडवरील चाटे कोचिंग क्लासेस च्या बाजूला नातेवाईकांना भेटून सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या दरम्यान घराकडे परतत होत्या. याच वेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्यावर झडप घालून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याचे मिनी गंठण असा सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज हिसकावून पळ काढला.
बीड शहरात मागील काही महिन्यांपासून चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. मात्र दिवसाढवळ्या, वस्तीच्या परिसरात अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये, विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. “बीडमध्ये प्रथमच दिवसाढवळ्या चेन स्नॅचिंगची घटना घडली,” अशी चर्चा नागरिकांमध्ये होत असून पोलिसांच्या गस्त व सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा घालण्यासाठी शहरात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.





