पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड.
८ जुगारी ताब्यात,५.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त.

= स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह=
बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर बीड दिनांक १२ डिसेंबर रोजी रात्री उशिरा पोलिसांच्या विशेष पथकाने अचानक धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून ५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ही कारवाई पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत होत असताना देखील स्थानिक पोलिसांकडून यापूर्वी कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे. बीड पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले असतानाही, पेठ बीड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मटका, जुगार, गुटखा, अवैध दारू विक्री खुलेआम सुरू असल्याचे दिसून येत आहे.
तसेच बार्शी नाका भागातून कत्तलसाठी जाणारे जनावराची अनेक वाहने जात असून त्याकडून देखील पोलिस वसुली जोरात होत असल्याची चर्चा आहे.
पेठ बीड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दारू विक्री सुरू असून गांधीनगर, बार्शी नाका, मोंढा, एमआयडीसी, इमामपूर रोड, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात अवैध धंदे बिनधास्त सुरू आहेत. विशेष म्हणजे या भागात प्रामुख्याने कष्टकरी, मोलमजुरी करणारा वर्ग वास्तव्यास असून, येथे २४ तास दारू विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
कडबा मार्केट परिसरातही अवैध धंदे फोफावत असतानाही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने पोलीस कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बीड पोलीस पथक बाहेरून येऊन कारवाई करते, मग स्थानिक ठाणे प्रमुख व कर्मचारी नेमके काय करत आहेत? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
या प्रकारामुळे बीड पोलीस अधीक्षकांनी पेठ बीड पोलीस ठाण्यातील अर्थपूर्ण दुर्लक्षाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा बीड शहरातील अवैध धंद्यांना वचक बसणार नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
ही कारवाई पोलीस पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,पोलिस उपअधिक्षक पूजा पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय काटकर,पीएसआय सय्यद,पो.कॉ.६६५ सचिन आगलावे,पो.कॉ. ६४२ सुधीर हजारे,पो.कॉ. १९६७ अनिल घटमल यांनी कारवाई केली.






