दिवसा बंद घरांची पाहणी करून घरफोडी करणारा अटक.
चोरीचे दोन गुन्हे उघडकीस;स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी.

केज/धारूर परिसरातील दिवसा बंद घरे पाहून त्यांची केलेली घरफोडी प्रकरणे उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखा, बीड व केज-धारूर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे.
आरोपीकडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून दोन घरफोडीचे गुन्हे भेदण्यात पोलिसांना यश आले आहे.
दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी मौजे खाडेवाडी (ता. केज) येथे संभाजी बन्सी खाडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते. तसेच 17 नोव्हेंबर 2025 रोजी मौजे धारूर, केज रोड येथील बालाजी सांभराव पिलाजी यांच्या बंद घरातही चोरी झाली होती. या दोन्ही गुन्ह्यांची नोंद केज व धारूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
या गुन्ह्यांच्या तपासासाठी केज पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची पथके आरोपींचा शोध घेत होती.
गुप्त माहितीचा सुगावा, आरोपी जेरबंद
दिनांक 08 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, दोन्ही घरफोड्या या अहमदनगर (अहील्यानगर) जिल्ह्यातील वाळुंज पारगाव येथील अक्षय अस्तांदुर काळे व त्याचे वडील अस्तांदुर मोहन काळे यांनी केल्या आहेत.
त्यानुसार पथकाने छापा टाकला. आरोपी अक्षय काळे (वय 22) हा घरासमोर उभा असताना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला. चौकशीत त्याने केज व धारूर येथील दोन्ही घरफोड्यांची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात त्याचे वडील साथीदार होते, असेही उघड झाले.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून 29 ग्रॅम सोन्याचे दागिने, 5 तोळे चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल जप्त केली आहे.
पोलिसांची संयुक्त कामगिरी :
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक (अंबाजोगाई) सौ. चेतना तिडके, श्री शिवाजी बंटेवाड (स्थानिक गुन्हे शाखा, बीड) व पोनि स्वप्नील उनवणे (पो.ठा. केज) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, हवालदार महेश जोगदंड, राजू पठाण, भागवत शेलार, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, राजू वंजारे, अंमलदार बप्पासाहेब घोडके, अर्जुन यादव, मनोज परजणे, शमीम पाशा, चालक गणेश मराडे, सिद्धेश्वर मांजरे (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, बीड व पो.ठा. केज) यांनी विशेष सहभाग नोंदविला.
स्थानिक गुन्हे शाखेने अल्पावधीत दोन घरफोडी गुन्हे उकलत आजवर चकवा देणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.






