आता वाल्मीक कराडची यंत्रणा सांभाळणारा पोलीस अधिकारी कोण?बाळा बांगर यांचा सवाल.
लोकप्रतिनिधी त्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे व मुद्दे अधिवेशनात उपस्थित करणार आहेत.बाळा बांगर काय म्हणाले पहा.

बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी तपासात अपेक्षित गती नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांनी केला आहे. देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना धक्कादायक दावा केला “वाल्मीक कराडची संपूर्ण यंत्रणा एक पोलीस अधिकारी सांभाळतोय. आरोपी जेरबंद असले तरी यंत्रणा अजूनही सक्रिय आहे. लवकरच त्या अधिकाऱ्याचे नाव आम्ही जाहीर करू.”
यंत्रणेवर संशय, संस्थात्मक हत्येचा आरोप.
बाळा बांगर म्हणाले की, हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे आणि त्यामुळे तपास यंत्रणेवर संशय निर्माण होत आहे.
“यंत्रणेवर विश्वास ठेवतो, पण सतत चुकीची माहिती वरिष्ठांना दिली जाते. ही फक्त हत्या नाही… ही संस्थात्मक हत्या आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
त्यांनी पुढे सांगितले की, तत्कालीन बीड पोलिसांच्या एलसीबीमधील एक पोलीस निरीक्षक वाल्मीक कराडची कामे पाहत आहेत.
“त्या अधिकाऱ्यांची नावे आमच्याकडे आहेत. अधिवेशनात काही लोकप्रतिनिधीही हा मुद्दा उपस्थित करणार आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“शेवटच्या श्वासापर्यंत देशमुख कुटुंबीयांसोबत”
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आपण पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले.
“आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या विचारांना सलाम. १२ डिसेंबरला चार्ज फ्रेम होईल. पुढील ९ महिन्यांत आरोपींना कडक शिक्षा—आमची अपेक्षा फाशीचीच आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
हत्या प्रकरणाला वर्ष पूर्ण, तरीही न्याय अधांतरीत
संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी मुख्य आरोपी फरार, काही संशयितांवर ठोस कारवाई नाही आणि तपासात जाणवणारी ढिलाई—यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे.
“ज्या माणसात हृदय आहे तो या हत्येचं समर्थन करणार नाही,” असे म्हणत बांगर यांनी पोलिस यंत्रणेला आरसा दाखवला आहे.










