स्व.सरपंच देशमुख स्मरणार्थ स्कॅनडल मार्च.
आरोपी कृष्णा आंधळे फरार असल्याने संतापाची लाट;आरोपींना फाशीची मागणी; आरोपी सुटले तर महाराष्ट्र बंद: जरांगे पाटील.

बीड (प्रतिनिधी) मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला 9 डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले असूनही या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्ण आंधळे याला अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. एक वर्ष उलटून गेल्यानंतरही आरोपी फरार असल्याने गृह विभाग व पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून एक वर्षात आरोपींना फाशी देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु असे न झाल्याने फडणवीस सरकारवर रोष व्यक्त होत आहे.
हत्येच्या वर्षपूर्ती निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक मसाजोग येथे दाखल झाले. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही भेट देत न्याय मिळेपर्यंत लढा सुरु राहील असा संदेश दिला. “या हत्येतील आरोपी सुटत असतील तर महाराष्ट्र बंदची हाक देऊ,” असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
संध्याकाळी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सायंकाळी स्कॅन्डल (कॅंडल) मार्चचे आयोजन करण्यात आले. या मार्चमध्ये विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. हातात मेणबत्त्या घेऊन गावातून स्कॅन्डल मार्च काढण्यात आला आणि ‘संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे’, आरोपीला फाशी झालीच पाहिजे अश्या घोषणा देण्यात आल्या.
मसाजोगसह परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थांनी देखील या कॅंडल मार्चमध्ये सहभागी होऊन संतोष देशमुख यांना आदरांजली वाहिली. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी अधिक तीव्र होत असून, प्रशासनाने तातडीची भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.समाजातील जनतेमध्ये आता स्पष्टच नाराजी असून हत्येचा तपास गतीने करून आरोपींना कठोर शिक्षा दिली नाही, तर मोठ्या आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे.









