डोळ्यात चटणी टाकत;शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद.
काही तासातच टोळीला बेड्या;बीड स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी.

बीड (प्रतिनिधी) परळी/धर्मपुरी रस्त्यावर डोळ्यात मिरची चटणी टाकून व चाकूचा धाक दाखवून तरुणाची सोन्याची चैन व अंगठ्या लंपास करणारी टोळी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत गजाआड केली आहे. आरोपींकडून तब्बल १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटना कशी घडली?
दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी अरुणोदय मार्केटमधील बॉस फिटनेस येथे व्यायाम करून धारवती तांड्याकडे जाणारा युवक प्रेमचंद पवार हे काळरात्री देवी मंदिर रस्त्याने पुढे जात असताना संध्याकाळी सुमारे ७.३० वाजता दोन इसमांनी पल्सर मोटारसायकल आडवी लावून त्याला अडवले. त्यानंतर स्कुटीवरून आलेल्या आणखी दोघांनी चाकूचा धाक दाखवत त्याच्या डोळ्यात मिरचीची चटणी टाकली व सोन्याची चैन आणि दोन अंगठ्या जबरीने चोरून नेल्या.
या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 507/2025 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
गुप्त माहितीवरून टोळी जेरबंद :
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यात वाढत्या रोड रॉबरी गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे व त्यांच्या पथकाला ८ डिसेंबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी परळी परिसरात थांबले आहेत.
पथकाने तातडीने कारवाई करत खालील आरोपींना शिताफीने पकडले —
1. पंकज तुकाराम उगलमुगले (25), रा. पांगरी
2. वैभव राम बिडगर (20), रा. दाऊतपूर
3. श्यामसुंदर बालासाहेब फड (20), रा. मरळवाडी
4. आदित्य सुरेश उपाडे (20), रा. सिद्धार्थ नगर
तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत फिर्यादीचा पाठलाग करून जबरी चोरी केल्याचे उघड झाले.
मुद्देमाल जप्त :सोन्याची चैन,दोन अंगठ्या, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल स्कुटी,एक कोयता.
एकूण किंमत : 1,58,000/- रुपये.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्यासह स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि. सुशांत सुतळे, पो.ह. मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णू सानप, गोविंद भताने, पो.अं. सचिन आंधळे व चालक पो.ह. अतुल हराळे यांच्या पथकाने केली.
परळीतील वाढत्या जबरी चोरीच्या घटनांवर या कारवाईमुळे मोठा आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.









