पोलीस अधीक्षक कॉवत यांची दिपक देशमुख यांनी घेतली भेट.
कॉल रेकॉर्डिंगची गंभीर दखल घेऊन देशमुख कुटुंबीयांनी केली पोलिस संरक्षणाची मागणी.

बीड (प्रतिनिधी) – परळी वैजनाथ नगर परिषद निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर वाढत्या तणावाच्या परिस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ. संध्या दीपक देशमुख व त्यांचे पती दीपक रंगनाथ देशमुख यांनी आज बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पोलिस संरक्षण देण्याची औपचारिक मागणी केली.
या संदर्भात 29 नोव्हेंबर 2025 रोजीच संरक्षणाची मागणी करण्यात आली होती. तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे संरक्षण देण्याची विनंती केली होती. याची प्रत माहितीस्तव बीड पोलीस अधीक्षकांकडेही पाठविण्यात आली आहे. मात्र अद्याप प्रत्यक्ष संरक्षण उपलब्ध झाले नसल्याने आज पुन्हा मागणी करण्यात आली.
दरम्यान, परळी वैजनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, या हेतूने संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. परळी शहरासह पाच ठिकाणी 21 डिसेंबर रोजी निवडणूक होत असल्याने प्रशासनाला सजग राहण्याचे आवाहनही करण्यात आले.
याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार बाजीराव धर्माधिकारी यांच्या कथित मोबाईल रेकॉर्डिंगच्या व्हायरल प्रकरणानंतर दीपक देशमुख यांना संभाव्य धोका असल्याच्या चर्चांना उधाण आले, ज्यामुळे संरक्षणाची मागणी अधिक गंभीर झाली आहे.
दीपक देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, “निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून तणाव निर्माण होऊ नये यासाठी तातडीने संरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे.”
या निवेदनाच्या प्रत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि पालकमंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.






