दुचाकीला स्वाराच्या डोळ्यात चटणी टाकून गळ्यातील सोन्याची चैन व अंगठ्या लंपास.
परळी/धर्मापुरी रस्त्यावर रोड रॉबरीची धक्कादायक घटना.

बीड (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांत वाहन अडवून प्रवाशांना लुटण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाच प्रकारची आणखी एक धक्कादायक घटना परळी–धर्मापुरी रस्त्यावर घडली आहे.
दिनांक ५ डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास प्रेमचंद पवार (वय २५, व्यवसाय – ग्राहक सेवा केंद्र) हे दुचाकीने धर्मापुरीकडे जात असताना ही घटना घडली. अंधाराचा फायदा घेत पवार यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक देत अज्ञात लुटारूंनी त्यांची दुचाकी अडवली. त्यांनी पवार यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना क्षणभर बधिर केले व गळ्यातील सोन्याची चैन तसेच दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेऊन चोरट्यांनी पलायन केले.
या घटनेत सोन्याची चैन व अंगठ्यांची एकूण किंमत सुमारे २ लाख ४० हजार रुपये असल्याची माहिती पवार यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०७/२४ भा.द.वि. 309(4), 281, 26(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय निमोने करीत आहेत.
दरम्यान बीड–गेवराई मुख्य रस्त्यावर गडी येथे दोन दिवसांपूर्वी शिर्डीला जाणाऱ्या भक्तांची चारचाकी अडवून लुटण्याची धक्कादायक घटना घडली होती. या सलग वाढणाऱ्या रोड रॉबरीच्या घटनांमुळे जिल्ह्यात लुटारूंचा सक्रिय टोळी सक्रिय असल्याचे चित्र समोर येत आहे. परिणामी रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी रात्रीची ग्रस्त वाढण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.







