बीडच्या तरुणाची पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या.
प्रेयसीचा मृतदेह भाड्याच्या खोलीत आढळला;दुहेरी मृत्यूने खळबळ


बीड (प्रतिनिधी) बीड– प्रेमसंबंधातून घडलेल्या दुर्दैवी आणि धक्कादायक घटनांनी बीड शहरासह पुणे हादरले आहे.
बीड शहरातील बार्शी नाका, ढगे कॉलनी येथील तरुण गणेश काळे (२१) हा गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होता. 30 नोव्हेंबर रोजी पुणे पोलिसांकडून काळे कुटुंबियांना धक्कादायक माहिती मिळाली – गणेशने तळेगाव रेल्वे ट्रॅकवर रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.
दुसरीकडे, त्याच वेळी गणेशची प्रेयसी दिव्या निगोश (२०, रा. येरवडा) हिचा मृतदेह संगमवाडी परिसरातील गणेशच्या भाड्याच्या खोलीत आढळून आला. या दुहेरी मृत्यूमुळे बीड आणि पुणे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गणेश काळे यांनी आपल्या प्रियसीचा खून करून स्वतः आत्महत्या केली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
प्रेमसंबंधातून दुर्दैवी शेवट?
गणेश आणि दिव्या दोघेही पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. नोकरीदरम्यान झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले होते, अशी माहिती समोर आली आहे.
शनिवारी रात्री तळेगाव रेल्वे ट्रॅकवर गणेशचा मृतदेह आढळल्यानंतर दिव्या बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी येरवडा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी शोध घेत असताना संगमवाडीतील त्याच्या भाड्याच्या खोलीत प्रवेश केल्यावर दिव्याचा मृतदेहही आत आढळून आला.
पोलिस तपासाचा धागा :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर मृत्यूची अचूक कारणे स्पष्ट होतील.
दिव्याच्या चेहऱ्यावर आणि नाकावर जखमा आढळल्याने तिचा खून करून गणेशने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
प्रेमसंबंधातील वादातून ही संपूर्ण घटना घडली असावी, असाही पोलिसांचा प्राथमिक तर्क आहे. मात्र, दोन्ही मृत्यूंचे नेमके कारण, घटनेमागील परिस्थिती व अनुक्रम जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे.
या दुहेरी मृत्यूने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.रविवारी रात्री बीड येथील भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान मधील स्मशान भूमीत आठ वाजता गणेश काळेवर शोकाळुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.











