ब्रेकिंग न्यूज

सराफा व्यापाऱ्याकडून PSI ने चार लाख रुपये घेतल्याचा आरोप !

व्यापाऱ्यांने सांगितली आपबिती;PSI वर कार्यवाही न झाल्यास बीड जिल्हा बंदची हाक.

बीड( प्रतिनिधी)बीड शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधील पीएसआय गजानन क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईतील सोन्याच्या व्यापाऱ्या कडून चार लाख रुपये जबरदस्तीने घेतल्याचा गंभीर आरोप एका व्यापाऱ्याने केला आहे. या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास बीड जिल्हा बंदची हाक दिली जाईल, असा इशारा मराठवाडा व बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी दिला.

 मुंबईचे सराफ व्यापारी मयंक जैन मागील 17-18 वर्षांपासून व्यापारासाठी बीड येथे येत असतात. बीडमध्ये विशाल लॉजमध्ये मुक्काम करत असताना, लॉज तपासणीच्या नावाखाली काही पोलीस कर्मचारी त्यांच्या खोलीत आले. व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्यांचे म्हणणे न ऐकता सोने, मोबाईल आणि त्यांच्या वस्तू ताब्यात घेतल्या आणि संपर्क बंद करून सात लाख रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

व्यापाऱ्याने रात्री 2.23 वाजता ओळखीच्या स्थानिक व्यापाऱ्यांना फोन करून मेडिकल इमर्जन्सीचे कारण देत चार लाख रुपये उभे करण्यास सांगितले. त्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांकडे चार लाख रुपये देण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. उर्वरित तीन लाख रुपये सकाळी 12 वाजेपर्यंत न दिल्यास व्यापारी ज्या ज्या लोकांशी व्यवहार करतो, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला.

तसेच व्यापाऱ्याला पोलिस स्टेशनला न नेता ‘शुभम लॉज’ येथे रात्रभर थांबवण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी मराठवाडा व बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे केली आहे. “जनतेचे रक्षकच जर भक्षक ठरत असतील तर न्याय कोणाकडे मागायचा?” असा सवालही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. तात्काळ बीड पोलीस अधीक्षक यांनी या सराफा व्यापाऱ्याच्या तक्रारीची दखल घेऊन सखोल चौकशी करून त्या पोलीस अधिकाऱ्यात बाबत पुरावे मिळाले तर कारवाई करणार असे आश्वासन दिले.

बीड सराफा व्यापारी गणेशजी बेद्रे (मराठवाडा व बीड जिल्हा अध्यक्ष),मंगेश लोळगे (जिल्हा सचिव),वैभव शहाणे (जिल्हा उपाध्यक्ष),रामेश्वर शहाणे (मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख),सुधाकर दहिवाळ (मराठवाडा उपाध्यक्ष)आदींचा समावेश आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button