बीड नगरपालिकेत उमेदवारांची जत्रा ; अर्ज भरताना गोंधळाचे चित्र.
घड्याळ मुजीब शेख;घुमरेच्या हाती कमळ;तुतारी कोणाच्या हाती ?

बीड (प्रतिनिधी) — बीड नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत आज प्रचंड हालचाल पाहायला मिळाली. नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा आज अंतिम दिवस असल्याने सकाळपासूनच नगरपालिकेत उमेदवार व कार्यकर्त्यांची झुंबड उडाली.
अनेक इच्छुक उमेदवार एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत ताटकळत बसलेले दिसले तर काही जण कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी घाईगडबड करत धावपळीत होते. प्रशासनाचे काउंटर, पडताळणी कक्ष आणि नगरपालिका परिसर दिवसभर गजबजलेले चित्र निर्माण झाले.
दरम्यान, काही पक्षांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केल्याने त्यांच्या कार्यालयांत जल्लोषाचे वातावरण होते.
भाजपकडून घुमरे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून दैनिक सिटीजनचे संपादक मुजीब शेख यांची अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजूनही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा न झाल्याने गटातील इच्छुकांमध्ये संभ्रम व तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले. समर्थकांमध्ये विविध चर्चांना ऊत आला असून अंतिम क्षणी नाव जाहीर होण्याची उत्सुकता कायम आहे.







