डॉ.योगेश क्षीरसागर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना;आजच भाजप प्रवेश निश्चित ?
भाजप प्रवेशाने बीडच्या निवडणुकीचे समीकरण बदलणार.

बीड – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेल्या अंतर्गत कलहाचा मोठा परिणाम समोर येत आहे. विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पक्षाला मोठा धक्का दिला असून आता ते थेट भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी डॉ. क्षीरसागर संभाजीनगरला रवाना झाले असून या भेटीतच त्यांच्या भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
गेल्या तीन दिवसांपासूनच क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशा संदर्भातील चर्चेला उधाण आले होते. मात्र आजच्या सीएम भेटीमुळे या चर्चांना पुष्टी मिळाल्याचे मानले जात आहे.
निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले, म्हणून राजीनामा
नगरपालिका उमेदवार ठरविण्याच्या महत्त्वाच्या बैठकीत स्वतःला सतत दुर्लक्षित केल्याचा आरोप करत क्षीरसागर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना ईमेलद्वारे राजीनामा सादर केला.
बीड नगरपालिकेत क्षीरसागर कुटुंबाचे वर्चस्व दशकांपासून कायम असल्याने हा राजीनामा आणि संभाव्य पक्षांतर महत्वाचे मानले जात आहे. गेली 35 वर्ष क्षीरसागराकडे एक हाती नगरपालिक सत्ता असून आता माजी नगरअध्यक्ष भारत भूषण क्षीरसागर यांची कमतरता भासत असल्याचे देखील बोलले जात आहे.
भाजप प्रवेशाने बीडच्या निवडणुकीचे समीकरण बदलणार :
डॉ. क्षीरसागर यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाल्यास बीड नगरपालिका निवडणुकीचे विद्यमान गणित पूर्णपणे बदलणार आहे.
पंकजा मुंडे यांच्याशी त्यांचे मागील काही वर्षांपासून सुरू असलेले सख्य आता उघडपणे समोर आले असून, त्यांच्या नेतृत्वाखालीच ते निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजपमध्ये प्रवेश मिळाल्यास क्षीरसागर कुटुंबीयांचे वर्चस्व भाजपच्या बाजूला जाईल, ज्यामुळे शरद पवार समर्थक गटासह संदीप क्षीरसागर यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे.
आजच घोषणा?
आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना क्षीरसागर यांनी राजीनाम्यामागील अनेक कारणांवर भाष्य केले.
आजच भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता अत्यंत मजबूत आहे.भाजप प्रवेशानंतर बीडमध्ये चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.









