
बीड (प्रतिनिधी) — अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) बीड यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत सोलापूर जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली असून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई PSI पल्लवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
पोस्टे दिंद्रूड येथील गुन्हा रजिस्टर नंबर ०२/२०२४, कलम ३६३ व ३७० भादवी हा गुन्हा सध्या AHTU कडे तपासावर होता. फिर्यादी तसेच आरोपीच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीनंतर तांत्रिक तपासाच्या आधारे पीडित व आरोपी सोलापूर जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले.
बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानुसार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी AHTU ची टीम सोलापूरकडे रवाना झाली. रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर अखेर पहाटे ३ वाजता पीडित मुलगी व आरोपी हे दोघे केडगाव (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथे मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन पोस्टे करमाळा येथे हजर करण्यात आले व नंतर बीडकडे रवाना करण्यात आले.
यानंतर AHTU टीमने पीडित मुलगी व आरोपीला पुढील तपासासाठी पोस्टे दिंद्रूड येथे सुपूर्द केले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, प्रदीप येवले, अशोक शिंदे तसेच AHTU बीड पथकाने संयुक्तपणे केली.









