शिवनीत दिवसाढवळ्या घरफोडी.
दिवसाढवळ्या चोरीच्या घटनेने पोलिसांच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह !

बीड(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, चोरट्यांच्या धाडसाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर बीड शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या शिवनी गावात दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अनिल भानुदास काळे यांच्या घरात 12 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पाळत ठेऊन घरी कोणीच नसल्याची खात्री करून तीन खोल्यांची कुलपे तोडली. त्यानंतर कपाट फोडून सुमारे 35 ग्रॅम सोनं, 10 ग्रॅम चांदी आणि 40 हजार रुपयांचा मुद्देमाल असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले, परंतु कोणताही ठसा हाती लागला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास शिवनीचे बीट अमलदार वनवे साहेब तसेच पिंपळनेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत.
दरम्यान, बीड जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, पोलिसांच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.









