पुन्हा दिवसाढवळ्या दुचाकी चोरी पहा ! पोलिस झोपेत की चोर हुशार ?
बीड शहरात चोर बिनधास्त,मोकाट.पोलिसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप.

बीड (प्रतिनिधी) — बीड शहरात दिवसाढवळ्या दुचाकी चोरीच्या घटनांनी अक्षरशः थैमान घातले आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत असूनही पोलिसांना त्यांचा शोध लागत नाही, हे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे.
मागील आठवड्यातच बीड शासकीय रुग्णालयासमोरील पोलिस चौकीजवळ दोन दुचाकी चोरीला गेल्या होत्या. ती घटना ताजी असतानाच, बीड शहरातून गजबजलेल्या ठिकाणावरून दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेदोन वाजता विश्वजीत हॉस्पिटलसमोर उभी असलेली MH23 BA 8357 ही दुचाकी चोरट्यांनी लंपास केली.
विशेष म्हणजे, हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असूनही पोलिसांना त्याचा माग काढता आलेला नाही. नागरिकांना आता पोलिस तपासावरच संशय येऊ लागला आहे.
“दर आठवड्याला शहरात दुचाकी चोरी घडते, पण पोलिसांकडून फक्त ‘तपास सुरू आहे’ एवढंच उत्तर मिळतं. नागरिकांची मोटारसायकल कुठे जाते, याची कुणालाच कल्पना नाही,” असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरात चोरट्यांनी अक्षरशः ‘पोलिसांना खुले आव्हान’ दिले असून, पोलिस यंत्रणा फक्त कॅमेऱ्यातील पुरावे पाहण्यातच अडकली आहे. चोर पकडण्यात अपयश आले, तर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, नागरिकांनी वाहन सुरक्षेसाठी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले असले, तरी नागरिकांना अपेक्षा आहे दुचाकी चोरीचा घटनेकडे गांभीर्याने पाहून पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालावे व पोलिसांनी झोपेतून जागे व्हावे व चोराच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी नागरिकांत होत आहे.











