बीडमध्ये शिवसेनेच्या उमेदवार निवडीसाठी 10 नोव्हेंबर रोजी मुलाखती !
इच्छुक उमेदवारांनी आपल्या कार्य अहवालसह उपस्थित राहावे- अनिलदादा जगताप.

बीड, प्रतिनिधी- आगामी नगरपालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने पक्षाकडून उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांची मुलाखत येत्या सोमवारी दि. 10 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. या मुलाखतींचे आयोजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, बीड येथे करण्यात आले आहे. सर्व इच्छुकांनी आपल्या कार्य अहवालासह सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी केले आहे.
मुलाखतीदरम्यान बीड शहरातील शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी व निरीक्षक उपस्थित राहणार असून, प्रत्येक प्रभागातून अभ्यासू, नेतृत्वसक्षम, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख चेहरा पुढे आणण्यावर भर दिला जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार असल्याचे अनिलदादा जगताप यांनी स्पष्ट केले. नगरपालिका निवडणुका या केवळ राजकीय स्पर्धा नसून शहराच्या भविष्यास आकार देणाऱ्या प्रक्रिया आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वाहतूक, बाजारव्यवस्था व नागरिक कल्याण यांसारख्या जीवनावश्यक कामांची जबाबदारी नगरपालिका व्यवस्थेवर असते. त्यामुळे सक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व निवडणे अत्यावश्यक असल्याचेही जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी नमूद केले. शिवसेनेच्या उमेदवार निवड प्रक्रियेत इच्छुकांनी वेळेत उपस्थित राहून सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी केले आहे.











