बीडमध्ये गोरक्षकाला महामार्ग पोलिस अधिकाऱ्याकडून बेदम मारहाण !
पाडळशिंगी टोल नाक्यावरील घटनेने खळबळ,पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.

बीड प्रतिनिधी:- कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन तपासण्यास सांगणाऱ्या एका गोरक्षकाला पाडळशिंगी टोल नाक्यावर महामार्ग पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या गोरक्षकावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे जनतेचे रक्षकच भक्षक बनत असल्याचा संताप व्यक्त होत असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,गोरक्षक पाळवदे व केशव रत्नपारखे यांना बार्शी रस्त्यावरून गेवराईकडे जनावरे घेऊन एक पिकअप वाहन जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीने या वाहनाचा पाठलाग सुरू केला.पाठलाग करताना हे वाहन बीड बायपास मार्गे सुसाट वेगाने पाडळशिंगी टोल नाक्याच्या दिशेने निघाले.गोरक्षकांनी त्वरीत पाडळशिंगी टोल नाक्यावर उपस्थित असलेल्या महामार्ग पोलिसांशी संपर्क साधला आणि संशयित वाहनात कत्तलीसाठी जनावरे जात असल्याचा संशय व्यक्त करत ते वाहन अडवून तपासणी करण्याची विनंती केली.
व्हिडिओ काढल्याने वाढला वाद :
महामार्ग पोलिसांनी गोरक्षकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत संशयित वाहन सोडण्याचा प्रयत्न केला,ज्यामुळे वाद निर्माण झाला. हा प्रकार पाहता गोरक्षकांनी घटनेचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली.याच गोष्टीचा राग आल्याने, पोलीस अधिकारी मुंडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गोरक्षकाला भर टोल नाक्यावर मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाण केल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी गोरक्षकाला टोल नाक्यावरील पोलिस चौकी वरच्या मजल्यावर घेऊन जात दोघांना बेदम मारहाण केली. एवढच नव्हे तर, त्याचा मोबाईल हिसकावून त्यामधील काढलेले व्हिडिओ डेटाही डिलीट करण्यात आला.
गोरक्षकावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी !
या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी पीडित गोरक्षकावर कोणतीही कारवाई न करता त्याला ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या दबावामुळे गोरक्षकाने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. तसेच, गोरक्षकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू,कारवाईची मागणी :
सध्या जखमी गोरक्षक पाळवदे हे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. गोरक्षक संघटनेने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून,पोलिस अधीक्षक (SP) यांनी तातडीने पाडळशिंगी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी आणि मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. जनतेचे रक्षकच जर असे भक्षक बनत असतील, तर न्याय कोणाकडे मागायचा,असा संतप्त सवाल गोरक्षकांनी उपस्थित केला आहे.







